१ ऑग, २०१०

चरवैती चरवैती

                     श्रीमती इरावती कर्वे या माझ्या आवडत्या लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत.अभ्यासातून आलेला परखडपणा व त्यातुन जाणवणारे विचारातील वेगळेपण हे मला जाणवलेले त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट.अर्थात एव्हड्या मोठ्या लेखिकेच्या लेखना बद्दल मी अधिक काही लिहीणे लहान तोंडी मोठा घास होईल हे मी जाणतो.
                  या लेखिकेचा एक धडा आम्हाला शालेय क्रमिक पुस्तकात होता.त्या लेखाचा आशय आज तितकासा आता आठवत नाही पण त्याचा शेवट मात्र आठवतो.त्या लिहीतात पक्षि प्रतिवर्षी नित्यनेमाने स्थलांतर करतात आणि परत आपल्या मुळ स्थानी परत जातात. त्यातुन पक्षि मानवाला संदेश देतात, तो म्हणजे ’चरवैती चरवैती ’. याचाच अर्थ चालत रहा चालत रहा. स्थलांतराच्या या प्रक्रियेत पक्षि आपल्या जीवलगांना व सोबत्यांना गमावत असतात पण तरीही ते आपला दरवर्षीचा मार्ग सोडत नाहीत.माणसाच्या जीवनातही असच घडत असत.आपण देखिल आपल्या जीवनात जीवलगांना व सोबत्यांना गमावतो. कधी काळाच्या दैवगतीमुळे तर कधी काही वैयक्तीक कारणांमुळे. अर्थात त्यामुळे आपल्याला पण आपल चालण थांबवता येत नाही.
                 तेव्हा पशु-पक्षांच असो की माणसांच ,जीवन हे असच आहे. त्याच्या प्रत्येक वळणावळणावर अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. काहींशी मनाचे सुर जुळतात तर काहींशी नाही.अस असल तरी भॆटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही बरे वाईट अनुभव देवून जात असते.त्या पैकी सोडून गेलेल्यांच दुख: विसरलो आहे अस वाटत न वाटत तोच एखादी घटना त्या जखमेवरची खपली बाजूला करते अन ते दुख: परत भळाभळा वाहायला सुरु होत.ज्या प्रमाणे दुख:द घटनांच्या आठवणी त्रास देतात तसच कधिकाळी काही काळ आपल्या बरोबर चार पावल चाललेल्या अनेकांची आठवण मनाला सुखावून जाते.
                असे असल तरी आजच्या युगाचा मंत्र आहे " काहीही करा , कसही करा पण यशस्वी व्हा.".त्या मुळे नैतीकतेच्या परंपरा या आपल्याला जोखड वाटु लागल्या आहेत. आमचे आदर्श आता छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज नाहीत तर धीरुभाई अंबानी आहेत.अश्या परिस्थितीत प्रियजनांची आठवण काढायला किंवा त्यांच्या सुखदुखा:त सामील व्हायला वेळ कोणाला आहे.यशस्वी होण्याच्या आकांक्षे पुढे जीवनातले छोटेमोठे आनंद घेण आपण विसरुनच गेलो आहोत.
                    तरी सुद्धा एकट असताना मनाच्या आत दडुन बसलेल्या या आठवणी उफ़ाळून वर येतातच. अश्याच काही आठवणींचा घेतलेला धुंडोळा म्हणजेच ’चरवैती चरवैती’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: