१० डिसें, २०१०

सन आठराशे सत्तावन्न (१८५७)

                      सन आठराशे सत्तावन्न (१८५७)


                                          लेखक - नारायण केशव बेहरे
                                       प्रकाशक - श्री विद्या प्रकाशन ,पुणे
                                          आवृत्ती - ३ री, दि. १० मे २००७

१८५७ चा विषय निघाला की,"१८५७चे स्वातंत्रसमर" हे स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांचे पुस्तक आठवते. आपल्या पैकी बहुतेकांनी हे पुस्तक वाचलेले असेलच. त्यामुळे हिंदुस्तानाच्या इतिहासातील या कालखंडा बद्दल एक निश्चित असे मत आपल्या मनात असत जे सावरकरांच्या पुस्तकावरुन तयार झालेल असत. त्या मतांना साधार छेद देण्याच आणि एका वेगळ्या अंगाने ’१८५७’ बद्दल विचार करण्यास प्रवृत्त करणार एक पुस्तक नुकतच माझ्या वाचनात आलं. पुस्तकाच नाव आहे " सन आठराशे सत्तावन्न " आणि त्याचे लेखक आहेत नारायण केशव बेहरे. १८५७ या कालखंडाच्या बाबत श्री. बेहरे यांनी लिहीलेल्या या अभ्यास पुर्ण पुस्तका बद्दल स्वत: वीर सावरकरांनी गौरवोद्गगार काढले आहेत ते असे:
" मी १९५७चे स्वातंत्रसमर हे पुस्तक इंग्लंड्मध्ये लिहिले. परंतू ते लिहीताना इतिहासाची सर्वच साधन उपलब्ध नव्हती. परंतू ते लिहीताना एकच उद्देश होता तो म्हणजे भारताचे स्वातंत्र मिळण्या करीता सर्व देशबांधवांच्या मनात स्वातंत्रतेची ज्योत पेटवावी.त्यामुळे त्या पुस्तकातले सर्वच प्रसंग इतिहासाला धरुन असतील असे नाही. खर्‍या इतिहासाशी प्रामाणीक राहून जर कोणी या विषयावर लिहीले असेल तर ते प्रा. नारायणराव बेहरे यांनी. तेव्हा त्यांचा सन आठराशे सत्तावन्न हा ग्रंथ त्या दृष्टीने पाहावा."
हे पुस्तक म्हणजे अभ्यासू ग्रंथ असल्याने सर्वच इतिहास प्रेमी लोकांनी जरुर वाचावा जेणेकरुन आपल्या इतिहासा कडे त्रयस्थ नजरेने पाहाण्याची दृष्टी निश्चितच तयार होईल.पुस्तकातले निकर्ष हे काहीसे कटु वाटले तरी अभ्यासाअंती काढलेले असल्याने मान्य करायलाच हवेत. ते खालीलप्रमाणे आहेत:
(१) श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेल्या मराठी माणसांच्या राजसत्तेच्या रो्पट्याचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले ते रणधुरंदर थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात. त्याचीच परिणीती मराठी सैन्याच्या अटकेपार जाण्यात झाली.त्यावेळी मराठी माणसांच्या शौर्याचा इतका दबदबा समस्त हिंदुस्थानात होता की अटकेपार जाताना मराठी सैन्याला सबंध हिंदुस्थानात कोठेही प्रतिकार झाला नाही.मोगल आणि राजपुतांनी मराठ्यांचे वर्चस्व जणू मनोमनी मान्यच केले होते.एकंदरीत काय मराठी माणसांचे शौर्य आणि राजकीय वर्चस्व समस्त हिंदुस्थानाने मान्यच केले होते.मोगल सत्ता इतकी दुबळी झाली हॊती की, मोगल बादशाहाच्या अंमलाखालील प्रांतातून चौथ व सरदेशमुखी मराठे सरदार वसुल करत असत.त्यामुळे इंग्रजांचा युनियन जॅक ज्या क्षणी शनिवार वाड्यावर फ़डकला त्याच क्षणी इंग्रजांचे साम्राज्य हिंदुस्तानावर स्थापीत झाले असे समजण्यात येते. त्या मुळे मुसलमानां पासून हिंदुस्तानची सत्ता इंग्रजांनी मिळवली हा अपसमज हिंदुस्तानी माणसांनी , विशेष करुन मराठी माणसांनी मनातून पार काढुन टाकला पाहीजे.इंग्रजांनी हिंदुस्तानची सत्ता ही मराठ्यांचा पराभव करुनच मिळवली हे सत्य नाकारताच येत नाही.
(२)इंग्रजांचे साम्राज्य हे इस्ट इंडीया कंपनीच्या रुपाने सुरुवातीला प्रस्थापीत झाले होते. व्यापार करण्याच्या हेतुने चंचुप्रवेश केलेल्या कंपनीने युक्ती प्रवॄत्तीने इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत केले.कंपनीचा हिंदुस्तानातील गव्हर्नर जनरल हा कंपनीच्या वतीने कार्यभार पाहात असे. एका अर्थी गव्हर्नरच्या हाती निरंकुश सत्ता होती.या कंपनीचे धोरण हे सुरुवातीला तरी व्यापारी म्हणुन नफ़ा कमवण्याचेच होते आणी त्या बद्दल दोष देण्यासारखे असे काही नाही. तथापि नंतर मात्र कंपनीने या देशाच्या राजकारणात ढवळा ढवळ करण्यास सुरुवात केली. त्या साठी तैनाती फ़ौजेच्या रुपाने कंपनीने स्वत:चे सैन्य उभारले. या फौजेचा खर्च तैनाती खर्च बाळगणारा राजा अथवा संस्थानीक करीत असला तरी ही फौज कंपनीच्या अधिकार्‍यांचेच हुकुम मानत असे.त्यामुळे कोणताही खर्च न करता कंपनीला सैन्याची उभारणी करता येणे शक्य झाले.इंग्रजांच्या या बुध्दी कौशल्याची तारीफच करायला हवी नाही का?
(३) सन १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन आला.त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत. या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली.त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रीक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती ( नीती कसली अनीती ) होती. या मुळे हिंदुस्तानातील राजे अथवा संस्थानीक यांच्यात मोठा असंतोष निर्माण झाला होता. या पार्श्वभुमीवर १८५७ च्या बंडाची बीजे रोवली गेली होती.
(३) त्यातच बंदुकीच्या काडतुसांना गाईच चरबी लावलेली असायची या धार्मिक कारणाची भर पडली.
(४) या बंडामागे हिंदुस्तान हे एक राष्ट्र आहे ही भावना कोठेच नव्हती. बंडात भाग घेणारे अथवा त्यास खतपाणी घालणारे हे राज्य गमावलेले भुतपुर्व राजे अथवा संस्थानिक होते.या बंडात भाग घेणारे बहुतांश लोक लुटालुट करीत ज्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या बंडाविषयी उदासिनता निर्माण झाली.सर्वसामान्य जनतेचा पाठींबा नसेल तर क्रांती यशस्वी होत नाही . त्यामुळे इंग्रजी सैन्य संख्येने कमी असुनही हे बंड मोडणे त्यांना शक्य झाले.
(५) बंडाचा प्रभाव हा उत्तर हिंदुस्थानातील मर्यादीत भागात होता. बादशाहाच्या नावाने सत्ता स्थापीत झाली तर मुसलमान परत शिरजोर होवुन अत्याचार करतील या साधार भितीने उत्तर हिंदुस्तानातील शिख, गुरखे यांनी इंग्रजांना बंड मोडण्यास मदत केली.
(६) दक्षिणेचा बहुतांश भागात शांतता होती. बराचश्या मद्राशी पलटणींनी तर बंड मोडण्यात भाग घेतला. या बंडात नानासाहेब पेशवे, तात्या टोपे , राणी लक्ष्मीबाई आदी मराठी रणधुरंदरांनी बंडवाल्यांचे नेतृत्व केले असले तरी महाराष्ट्रातुन त्यांना कुठलाही पाठींबा मिळाला नाही हे सत्य आहे. किंबहुना या धामधुमीत मराठी मुलखात शांततात होती.
ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली तर हे बंड का अयशस्वी झाले ते कळुन येते. असे असले तरी या बंडामुळे काही गोष्टी निश्चितच घडुन आल्या. त्या म्हणजे-
(अ) हिंदुस्थानी जनतेतील असंतोष लक्षात घेवून इंग्लंडच्या राणीने इस्ट इंडीया कंपनीच्या हातुन हिंदुस्थानचा कार्यभार काढुन घेतला.
(ब) राणीने कार्यभार स्वत:कडे घेतल्यावर येथील जनतेसाठी जाहीरनामा जाहीर केला.
(क) त्यात राणीने दिलेली आश्वासने लक्षात घेतली तर अप्रत्यक्षरीत्या कंपनीचे हिंदुस्थानातील धोरण अन्यायकारक होते याचीच कबुली मिळते.
(ड) हा जाहीरनामा या पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे. तो मुळापासुन वाचण्या सारखा आहे. त्यातील अनेक बाबी या आपल्या घटनेच्या मुलतत्वांचा आधार आहेत असे लक्षात येते.
एकंदरीत काय अभ्यासातुन लिहिलेला इतिहास आणि अभिनिवेशातुन लिहिलेला इतिहास या पैकी कोणातुन किती व काय घ्यायच याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर तर येतेच पण त्याच बरोबर एखाद्या विशिष्ठ कालखंडातील घटनाक्रम इतिहासात काय निर्माण करु शकतो याची जाणिव होते.


३ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

सुंदर माहिती.. माहित नव्हतं या पुस्तकाबद्दल..

Devendra म्हणाले...

आभार. इतिहास घडतो की घडवला जातो हा प्रश्न मनाला पडतो तो अश्या वेगळ्या विचारांच्या पुस्तकां मुळे. आपण मराठी माणस ही इतिहास घडवणारी माणस मग आपल्यालाच प्रश्न पडायला हवेत नाही का?

भानस म्हणाले...

मलाही नव्हत माहित या पुस्तकाबद्दल. चला पुढच्या भेटीच्या लिस्ट मध्ये लिहून ठेवते. :)

माणसे कुठल्याश्या अंत:प्रेरणेने, ध्येयाने भारून जावून स्वत:ला वाहून घेतात आणि मग इतिहास घडतो. आजकाल हे भारून जाणेच हरवलेयं... :(