१६ एप्रि, २०११

अल्‌मोस्ट सिंगल

मेनका प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेलं "अल्‌मोस्ट सिंगल" हे अनुवादीत पुस्तक नुकतच वाचण्यात आलं. पुस्तकाची लेखिका आहे अव्दैता कला तर पुस्तकाचा सुंदर अनुवाद केला आहे आषुतोश उकिडवे यांनी. जागतिकरणाच्या तथाकथीत लाटेत जगण्याची आणि संस्कृतीची एकंदरीतच परिभाषा अमुलाग्र बदलत असताना व्यक्तीं व्यक्तीं मधले संबंध देखिल बदलत जात आहेत. माहितीच्या व तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करत आहे.त्यामुळे स्त्री असो की पुरुष, दोघांवरही आपापल्या क्षेत्रात टीकुन राहाण्याच आणि यशस्वी होण्याच दडपण आहे.पुढचं युग हे सेवाक्षेत्राच आहे.या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार असुन या क्षेत्रात आज स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने अग्रेसर आहेत.काही सेवाक्षेत्र तर अशी आहेत की त्यात स्त्रियांचा वरचष्मा आहे. त्यापैकी हॉटेल इंडस्ट्री ही सेवाक्षेत्रातली एक मोठी इंडस्ट्री आहे.या इंड्स्ट्रीला आपल्या ग्राहकांना परत परत येण्यास भाग पाडण्यास जाहिरातींपेक्षा मिळणारी सेवा हा महत्वाचा घटक आहे याची पुर्ण कल्पना आहे. त्या मुळे पंचतारांकीत हॉटेल मध्ये " गेस्ट रिलेशन मॅनेजर" या पदावर काम करताना आलेले अनुभव आणि त्यातील आव्हाने यावर लिहीलेले "अल्‌मोस्ट सिंगल" पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळी मन जरा साशंकच होत. पण पुस्तक जस जस वाचत गेलो तस तस मन प्रसन्न होत गेलं. अत्यंत सहजतेने केलेला खुसखुशित संवाद आणि त्यातुन वाचकांना नकळत अंतर्मुख करण्यातलं लेखिकेच कौशल्य याला दाद द्यायलाच हवी.पंचतारांकीत हॉटेलच्या विश्वाचा मध्यमवर्गीय मराठी मानसिकतेतुन प्रिया तेंडुलकर यांनी घेतलेल्या धुंडोळा आपण वाचला असेलच पण त्याहुन सर्वस्वी वेगळा अनुभव नविन पिढीच्या या लेखिकेच्या मानसिकतेतुन दिसुन येतो.मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या या दोन लेखिका पण त्यांचा जगण्याकडे बघण्यातला बदललेला दृष्टीकॊन एकाच वातावरणातील अनुभव संपुर्ण वेगळेपणाने व्यक्त करतो यालाच तर दोन पिढयातील अंतर म्हणायच का?
पुस्तकाची नायिका आहे आयेशा भाटीया ,जी एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये गेस्ट रिलेशन मॅनेजर या पदावर काम करित आहे. या पदावर काम करताना अनेक तर्‍हेवाईक बड्या ग्राहकांना आणि त्यांच्या नखर्‍यांना तिला समोर जाव लागत. याचा ताण अर्थातच तिच्या मनावर आहे. नायिकेच्या मनावरील मध्यमवर्गीय संस्कार आणि कॉस्मॉपॉलिटन जीवनशैली यातील विसंगतीला दैनंदिन जीवनात समोरे जाताना ती मात्र तिचा तोल सांभाळुन आहे. आपल्या बेधुंद वागण्याचे समर्थन करताना आपण आपले कौमार्य जपले आहे असं ती आवर्जुन सांगते. असं असलं तरी पार्ट्या, मद्य, आणि मैत्रिणीं बरोबर बेधुंद आयुष्य जगत असतानाच आपण अजुनही अविवाहीत आहोत याची खंत तिच्या मनात आहे. करियरच्या मागे धावताना अश्या प्रकारची ओढाताण होण हे आजच्या पिढीचं भागदेय आहे.अस असल तरी हे सर्व ज्या प्रकारे या पुस्तकात व्यक्त झालेल आहे त्या वरुन आजची पिढी दिसते तशी पुर्णच बेफिकीर नसुन त्यांचा जगण्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन त्यांच्याच नजरेनं पाहाण्याची गरज आहे याची पुस्तक वाचल्यावर जाणिव होते. या पुस्तकातील एक प्रसंग जरुर सांगावासा वाटतो.
आयेशाच्या दोन जिवलग मैत्रिणी आहेत.त्यातील एक तिच्या सारखीच अविवाहीत असुन चांगल्या जीवनसाथीच्या शोधात आहे तर दुसर्‍या मैत्रिणीचा नुकताच घटस्फोट झालेला आहे.एके दिवशी या तिघी मैत्रिणी मौजमजा करण्यासाठी पब जातात.तिथे तिच्या घटस्फोटीत मैत्रिणीला तिच्या एक्स नवरा भेटतो. त्यानंतर ती दोघ अचानक पबमधुन गायब होतात. काळजीने आयेशा रात्रभर तिच्याशी संपर्क साधण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.पण त्या मैत्रिणीचा मोबाईल बंद असतो.सकाळी त्या मैत्रिणीचाच आयेशाला फोन येतो.आयेशा त्या मैत्रिणीला काल रात्री तिच्यात आणि तिच्या एक्स नवर्‍यात काय झाल ते विचारते. मैत्रिण शांतपणे ती आणि तिच्या एक्स नवर्‍यामध्ये शारिरीक संबंध आल्याचे सांगते.त्याला ती ब्रेक-अप सेक्स अस म्हणते.हे ऐकल्यावर आयेशाला धक्काच बसतो. मैत्रिण मात्र शांतपणे तिला समजावते.ती म्हणते," काल आमच्यात जे घडलं तो निव्वळ सेक्स होता. केवळ वासनाशमन.पुरुषाला जशी गरज लागल्यावर तो भागवतो तसच बाईनं केल तर त्यात चुक काय?मी तुला खरचं सांगते आता आमच्यात कसलेही बंध उरलेले नाहीत.".थोडा विचार केल्यावर नायिकेला आपली मैत्रिण अंत:करणा पासुन आणि गांभिर्यान हे सांगत असल्याच जाणवतं.नायिका म्हणते," माझ्या मैत्रिणीच ते पोटतिडकेच म्हणणं मला पटलं.आयुष्य म्हणजे एक पुस्तकच असतं.एखाद्या उत्कंठावर्धक पुस्तकाचा शेवट जाणुन घेण्यासाठी आपण शेवटची पानं पुर्ण न वाचताच भरभर पान उलटतो. पण शेवट वाचल्यावर तुमच कुतुहल परत जागृत होत. मधली पान निट न वाचल्यानं शेवट नीट उमजला नाही अशी काहीशी भावना तुमची होते.मग शेवट निट कळण्यासाठी ती पानं परत एकदा वाचण्याचा निर्णय तुम्ही घेता.तसच माझ्या मैत्रिणीन आपल्या आयुष्याच्या या पुस्तकाची शेवटची पान परत येकदा निट वाचली आणि आयुष्यातील ते पुस्तक कायमच बंद केलं."
या प्रसंगावरुन नायिकेच्या अर्थातच लेखिकेच्या परिपक्व मनाची जाणिव आपल्याला होते आणि खुषखुशीत शैलीत लिहिलेल्या या पुस्तकाकडे जरासं गांभिर्यान पाहाव अस वाटायला लागतं.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: