२७ ऑक्टो, २०११

मुलांनो फटाके फोडाच.....

प्रिय बालमित्रांनो,
कालची बलीप्रतिपदा व लक्ष्मिपुजन खुप फटाके फोडुन तुम्ही दिवाळी साजरी केली असेलच. या वर्षात वाढलेली प्रचंड महागाई आणि अर्थातच त्यामुळे वाढलेल्या फटाक्यांच्या किंमती यामुळे कदाचीत आई-बाबांनी नाईलाजाने कमी फटाके खरेदी केले असतील तर गोष्टच वेगळी. पण फटाके फोडल्याने होणार्‍या तथाकथित प्रदुषणाच्या नावाखाली आई-बाबांनी फटाके फोडायला मज्जाव केला असेल तर मात्र ही नक्कीच गंभिर गोष्ट आहे.
मित्रांनो तुमची पिढी टेक्नोसॅव्ही आहे. त्यामुळे विविध प्रकारची माहीती सहजगत्या तुमच्या समोर क्षणार्धात उपलब्ध होवू शकते. प्रदुषणामुळे आणि विशेष करुन विविध यांत्रिक उत्पादनांच्या वापरातुन होणार्‍या वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे आपल्या पृथ्वी वरच्या ओझोन थरात मोठ्या प्रमाणात घट होत आहे हे तुमच्या पैकी काही जणांना शिक्षकांनी शिकवलं देखिल असेल. पण तुमच्या लक्षात तुमच्या शिक्षकांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात आणुन दिली नसेलच. ती म्हणजे मोठ्या माणसांनी वर्षभर केलेल्या प्रदुषणामुळे व नैसर्गिक स्तोत्रांच्या बेसुमार वापरामुळे होणारी पर्यावरणाची हानी ही प्रचंड प्रमाणात आहे.त्या पुढे तुमच्या लाडक्या बाप्पाच्या मुर्तींच्या विसर्जनामुळे आणि दिवाळीचे चार दिवस तुम्ही आनंदाने फोडलेल्या फटाक्यां मुळे होणारी पर्यावरणाची हानी खुपच शुल्लक आहे. असे असुनही तुम्हाला मनापासुन आनंद देणार्‍या या या गोष्टींमुळे होणार्‍या नाममात्र प्रदुषणाचा ईतका बागुलबुवा का बर केला जातो.हे म्हणजे विकसीत देशांनी जगातील नैसर्गिक स्त्रोतांचा बेलगाम वापर करुन जास्तीत जास्त प्रदुषण करायच आणि विकसनशील देशांनी केलेल्या प्रदुषणा बद्दल कांगावा करण्या सारखच आहे.
मग आता प्रश्न पडतो की प्रदुषण नक्की कश्यामुळे होत......
जलस्त्रोतांमध्ये होणार प्रदुषण हे प्रामुख्याने वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगीक वापरामुळे निर्माण झालेलं सांडपाणी विनाप्रक्रिया नद्यांमध्ये वा समुद्रामध्ये सोडल जात असल्यामुळे होत असतं. याच उत्तम उदाहरण म्हणजे दादरची चौपाटी आणि पुणे शहराला पाणी पुरवणार्‍या मुळा-मुठा नद्यांची आजची अवस्था.
कार्बनच उत्सर्जन वाढण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पेट्रोलजन्य पदार्थांच्या अतिवापर. जगभरात, विषेश करुन गेल्या काही वर्षात आपल्या देशातही, वैयक्तीक वापरावयाच्या दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या वापरामुळे शहरातल्या व हळुहळु खेड्यातल्या देखिल हवेतील प्रदुषण वाढत आहे. तेव्हा तुमचे बाबा जेव्हा कारने ऑफीसला जातात तेव्हा ते देखिल दरदिवशी प्रदुषणात भर घालत असतात नाही का?
अणुउर्जेची गरज मानवी जीवन अधिक सुखदायी करण्यासाठी असेलही पण जेव्हा चेंबर्लीन सारख्या दुर्घटनांमुळे अथवा जपान मधल्या त्सुनामी मुळे झालेल्या अणुभट्ट्यांच्या नाशामुळे किरणोत्सर्ग होतो तेव्हा होणारं प्रदुषण इतकं भयावह आहे की अजुन कित्येक वर्षे त्या भागात व आसपासच्या भागात मानवी वस्तीला तिथे राहाणं सुरक्षित असणार नाही. हा धोका लक्षात घेवुन अनेक देशांनी नविन अणुभट्ट्या न उभारण्याचा निर्णय घेतला आहे.अणुउर्जा प्रकल्पांचा मानवी जीवनास असलेला मोठा धॊका लक्षात घेवुन जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्रानं तर त्यांच्या देशातील सर्व अणुभट्ट्या टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा व २०२२ पर्यंत सर्वाच अणुभट्ट्या बंद करुन पर्या
यी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या देशात विद्युत निर्मीती साठी कोळश्याचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. आपल्या देशातील घनदाट व विविध प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असलेल्या जंगलांपैकी आपल्या महाराष्ट्रातल्या चंद्रपुर जिल्यातील ताडोबा हे एक जंगल आहे. त्याच जिल्ह्यात कोळशाच्या खाणींमुळे व कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पात निर्माण होणार्‍या कोळश्याच्या राखेमुळे ( coal ash) त्या जिल्ह्यातल्या जंगलातील जैविक साखळीवर (Eco System) होणार्‍या परिणामांचा आढावा कोणी कधी घेतला आहे का?. जंगलातील नष्ट झालेली जैविक साखळी परत तयार करण प्रगत मानवाला आज देखिल शक्य नाही . तर निसर्गाला देखिल ही समृद्ध जैविक साखळी परत निर्माण करायला लाखो वर्ष लागणार आहेत.
हे सर्व आपण पाहीलं ते नैसर्गिक प्रदुषणा बद्दल पण नात्या नात्यां मधल्या वाढत्या प्रदुषणाच काय?
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की प्रवासाच्या सुविधा नव्हत्या तरीही तुमचे आजी-आजोबा धडपड करत आपल्या नातेवाईकांना भेटायला वर्षातुन एकदा आवर्जुन जात असतं.तुमची आजी तर जवळपास दरवर्षी आपल्या मुलांना घेवुन तिच्या भावाच्या घरी दिवाळीला वा उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असे. त्यामुळे मामाच्या गावाला जावुन तुमच्या आई-बाबांनी त्यांच्या लहानपणी केलेल्या धमालीचे भरपुर किस्से त्यांच्याच तोंडुन अनेकवार तुम्ही ऎकले असतील. पण तुमच्या पैकी अनेक जण एकुलतं एक अपत्य असाल. तसच अनेकांच्या आई-बाबांना दुसरं भावंड नसेल. मग तुम्हाला भाऊ-बहीणींच्या व आत्या-मामा या नात्यां मधली गंमत कशी बरं कळणार. ’मामाच्या गावाला जावुला तुप रोटी खावुयाया गाण्यातली भावना कळायला मामा तर असायलाच हवा. तेव्हा मामाच नाही तर मामाच्या गावाला जावुन धमाल करण्याचा प्रश्नच कुठे येतो.
ज्या वेळी आजच्या सारख्या ई-मेल, दुरध्वनी, भमणध्वनी ( अरे हो तुम्ही इंग्रजी मिडीयम मध्ये शिकता हे विसरलोच की..... Telephone, Mobile म्हणायला हव होतं) सारख्या सुविधा नव्हत्या त्यावेळी पत्राद्वारे दुर असलेल्या जीवलगांशी संवाद साधला जात असे. त्या पत्रांतल्या हस्ताक्षरा वरुन पत्र लिहीणार्‍याची मनस्थिती व जाणवणारा भावनेतला ओलावा याचा अनुभव तुमच्या पिढीला कसा बरं येणार. तुम्ही कधी बाबाच्या ड्रॉवरमध्ये डोकावुन पाहील आहे का?. संधि मिळाली तर जरुर पाहा. तुम्हाला दिसेल की, तुमच्या बाबाला कधिकाळी अवचित आलेलं कोणा मित्राच पत्र त्यानं त्याच्या ड्रॉवर मधल्या जुन्या डायरिमध्ये चुकुन(?) ठेवुन दिलेल आहे. तेव्हा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल की एव्हढा टापटीप बाबा पण हे जुनं पत्र का बरं फाडुन टाकत नाही?
तुमच्या पैकी काही सुदैवी जणांच्या घरात आजी-आजोबा असतील. तुमचे म्हातारे आजोबा लोकलच्या गर्दीत तुमच्या आत्या आजीला दरवर्षी प्रमाणे उद्याही भाउबिजेला भेटायला जाणार असतील. त्यांची तब्येत आताश्या ठीक नसल्याने त्यांना तुम्ही त्यांचा मागच्या वर्षीच्या निश्चयाची आठवण करुन द्या बरं. मागच्या वर्षी खुप दमुनभागुन घरी आल्यानंतर आजोबांनी पुढच्या वर्षी भाउबिजेला लोकलच्या गर्दीत परत जाणार नाही असा निश्चय केला होता. त्या निश्चयाची आजोबांना आठवण करुन दिलीतच तर ते फक्त हसतील पण ते आत्या आजीकडे जाणार हे नक्की. बाबांना मात्र कामाच्या गडबडीमुळे व तुमची आत्याही दिवाळी साजरी करायला बाहेरगावी सहलीला गेली असल्याने बॅंक अकौंट मधुन मनी ट्रान्सफर व्दारे गिफ्ट देण्याचा छान पर्याय उपलब्ध आहे. पण या पैकी कोणत्या नात्यामधला ओलावा जास्त टिकला असेल बरं.
तुमचा सगळ्यात आवडता सण म्हणजे दिवाळी’.दिवाळी म्हणजे फटाके, फराळ हे तर आहेच पण मुळात तो आहे दीव्यांचा उत्सव. दिवाळीच्या दिवसात घरात देवापाशी, प्रवेशव्दाराच्या उंबरठ्याशी व परसदारातल्या तुळशीपाशी पणत्या लावणं आणि घरासमोर मांगल्याची प्रतिक असलेली रांगॊळी गृहलक्ष्मीन काढणं ही आपली मुळ परंपरा. आपला देश हा मुळात कृषिप्रधान देश त्या मुळे आपल्या या मोठ्या सणाची सुरुवात खर वसुबारसपासुन होते. या दिवशी आपल्या घरातल्या गाई-वासरांची पुजा करण म्हणजे अत्यंत आनंदाच्या क्षणी देखिल आपल्या परसदारातल्या प्राण्यांची जाणिवपुर्वक आठवण ठेवण हा सर्वोत्तम संस्कारच नाही का?. पण आताच्या ब्लॉक संस्कृतीमध्ये परसदार तर हरवलच आहे आणि त्याच बरोबर ऎन दिवाळीच्या दिवशी बाहेरगावी सहलीच्या जायच्या वाईट प्रथेमुळे देवापुढे अंधार व प्रवेशव्दाराला कुलुप लागतं. मग ती वास्तुदेवता फेंगशुई आणि वास्तुशास्त्राचे विविध उपाय करुन का प्रसन्न होणार?
मुलांनो आता एक प्रश्न तुमच्यासाठी.....
आजोबांनी अथवा आत्या-मामाने प्रेमानं दिलेल्या छोट्याश्या बिस्कीटाच्या पुड्यापेक्षा बाबांच्या क्लॅयंटने दिलेला चॉकलेटचा बॉक्स तुम्हाला जास्त आवडतो का? परक्या माणसांनी व्यावसाईक संबंधापोटी दिलेलं गिफ्ट आणि घरातल्या वडिलधार्‍यांनी मनापासुन दिलेली भेट यामधला फरक तुम्हाला समजावुन सांगण्याची जबाबदारी तुमच्या पालकांची. पण हा फरक समजावुन सांगण्यात जर ते कमी पडले तर तुमच्या कुटूंबातल्या नात्यांमध्ये निर्माण होणार्‍या मानसिक प्रदुषण मुळे होणारी हानी ही न भरुन पावणारी असेल नाही का?
तेव्हा आम्ही मोठ्या माणसांनी तुमच्या भवितव्याचा विचार न करता विविध प्रकारच प्रदुषण करायच आणि तुम्हाला मात्र प्रदुषणाचा बागुलबुवा दाखवुन छोट्या छोट्या आनंदा पासुन दुर ठेवायच हे म्हणजे मुळ दुखणं एकीकडे तर उपाय भलती कडेच अस होणार आहे. मग आता आई-बाबां कडे हट्ट करुन भरपुर फटाके फोडाच. जो पर्यंत जगातली मोठी माणसं प्रदुषण कमी करण्यासाठी स्वत: काही प्रयत्न जाणिवपुर्वक करत नाहीत तो पर्यंत तुम्हाला सुद्धा फटाके फोडण्याचा पुर्ण अधिकार आहे.
तेव्हा बालमित्रांनो तुम्हाला खुप फटाके, भरपेट फराळ आणि आजी-आजोबा, आत्या, मामा या नात्यां मधलं प्रेम आणि कौतुक मिळो याच दिवाळीच्या झुप खुप शुभेच्छा.
 

२ टिप्पण्या:

www.sumbran.blogspot.com म्हणाले...

अगदी मानासापून सांगतो मी सर्वाना फटके हे फोडलेच पाहिजेत मोठ्या माणसांनी भवितव्याचा विचार न करता विविध प्रकारच प्रदुषण करायच आणि मुलांना मात्र प्रदुषणाच्या नवरा फटके बंदी करायची यासारखा दुटप्पी पणा नाही.

sudeepmirza म्हणाले...

perfect post!