१४ नोव्हें, २०११

अल्टीमेटम

 

मॅथ्यु ग्लास या लेखकाची अल्टीमेटम ही पहीलीच कादंबरी असुन ती सन २००९ मध्ये अमेरिकेत प्रकाशित झाली.

.तिचे आतापर्यंत ६ भाषात अनुवाद झाले असुन तिचा मराठीतला सुदर्शन आठवले यांनी केलेला अनुवाद मेहता पब्लिशींग हाऊस यांनी प्रकाशित केला आहे.

कादंबरीचे कथानक हे आजपासुन सुमारे ४० ते ५० वर्षानंतर घडु शकेल अश्या भविष्यसुचक घटनाचक्रांवर आधारीत आहे

. मानवाच्या विकासाच्या प्रक्रीयेत जीवनाच्या झालेल्या यांत्रिकीकरणामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नाश होत आहे. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होवुन समुद्र किनार्‍या जवळील वरील लोकवस्तीला लवकरच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता जगभरातील पर्यावरणाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांना जाणवत आहे.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या वास्तव्यात येवु पाहाणार्‍या संकटाकडे ’बागुलबुवा’ म्हणुन दुर्लक्ष करण्यात येत आहे.जपानच्या किनार्‍यावर नुकत्याच ओढवलेल्या त्सुनामीच्या संकटामुळे तेथील लोकवस्तीची झालेली हानी व नष्ट झालेल्या अणुभट्ट्यांमुळे ओढवलेला किरणोत्सर्जनाचा धोका या कडे भविष्यामध्ये मानवाच्या विनाशास कारणीभुत ठरु पाहाणार्‍या घटनांचा इशारा म्हणुन जागतीक स्तरावर अभ्यास करण्याची निकड कधी नव्हे ती आज जाणवते आहे..

ज्यो बेंटन हा

अल्टीमेटम’ या कादंबरीचा नायक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो तोच मुळी पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची ग्वाही अमेरिकन जनतेला देवुन. त्यामुळे अर्थातच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणुन त्याची प्राथमिकता असते ती पर्यावरण रक्षणासाठी हितकारक ध्येयधोरणे व ठोस उपाययोजना अंमलात आणणे यालाच.राष्ट्राध्यक्ष होण्यापुर्वी त्याला पर्यावरणाच्या नाशामुळे झालेल्या व करावयाच्या मानवीवस्तीच्या स्थलांतर व पुर्नवसन या कामाची व्याप्ती, त्यासाठी लागणारा खर्च याची असलेली कल्पना यात आणि प्रत्यक्षात ओढवु पाहाणार संकट यात महद्‍अंतर आहे याची खरीखुरी जाणिव राष्ट्राध्यक्ष झाल्या लगेचच होते. पर्यावरणाचा प्रश्न हा एकट्या दुकट्या देशाने सोडवण्याचा प्रश्न नसुन जागतीक पातळीवर त्या बद्दल जाणिवपुर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे हे ही त्याच्या लक्षात येत. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या कादंबरीचा काळ आजपासुन ४०-५० वर्षानंतरचा असुन त्या वेळी अमेरिकेची जगाला नियंत्रीत करु शकणारी महासत्ता या स्थानाला चीनने धक्का देण्यास सुरुवात केलेली असते. त्या मुळे ज्यो बेंटन याला पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात यशस्वी होण्यासाठी चीनचे सहकार्य घेण्याशिवाय गत्यंतरच नसते. आणि मग त्यातुन सुरु होते ती आंतरराष्ट्रीय राजकारणातील एकमेकांच्या देशांचे हितसंबंध जपण्यासाठीची स्पर्धा , त्यासाठीचे कटकारस्थान आणि या सर्वामधुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी मार्ग काढण्यासाठीची काळा बरोबरची स्पर्धा..........

या जीवघेण्या स्पर्धेत काय नसतं....

चर्चांच गुर्‍हाळ, तडजोडीचे प्रयत्न करताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, उद्याची महासत्ता असलेल्या चीन मधिल देशांतर्गत राजकारण आणि ज्यो बेंटन याच्या संयमाची कसोटी पाहाणारी पर्यावरण रक्षणाच्या लढ्याची दमछाक करणारी वाटचाल.

मॅथ्यु ग्लास यांनी हे सर्व ईतकं सुंदर पद्धतीने कादंबरीत मांडल आहे की आपल्याला आपण देखिल जणु या सर्व घटनाचक्रां मध्ये प्रत्यक्ष भाग घेत आहोत अशी अनुभुती ही कादंबरी वाचताना पदोपदी येते.

तेव्हा ही कादंबरी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घटनांकडे जागरुकतेने पाहाणार्‍या व भारत-चीन या देशांमधल्या ताणतणावांकडे दक्ष राहुन पाहु शकणार्‍या सगळ्यांनी नक्कीच वाचली पाहीजे. सर्वात महत्वाच म्हणजे, कुठल्याही प्रश्नांकडे आम्हाला काय त्याचं अस न मानता जागतीकीकरणामुळे जगाच्या एका कोपर्‍यात उद्‍भवलेले संकट , मग ते मानवी असो की नैसर्गिक, दुसर्‍या क्षणी आपल्या दारात यायला आता फार वेळ नाही याची जाणिव ही कादंबरी वाचल्यावर झाल्या शिवाय राहात नाही.

*****

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: