१३ सप्टें, २०१२

सत्त्याचा ‘बाप’ (भाग-४)


सत्त्याचा बाप (भाग-४)

खुप दिवसांनी याला बार मध्ये आलेलं पाहुन जुनी वेटर मंडळी एक एक करुन याला भेटायला आली. हा बाबा सगळी कडेच त्याच्या मनमिळावू आणि दुसर्‍याला नेहमीच मदत करायच्या वृत्ती मुळे  लोकप्रिय. त्या मुळे वेटर सुध्दा त्याची चौकशी करायला आले याच मला आश्चर्य वाटण्याचं कारणच नव्हतं. हा सुध्दा जणु काहीच घडलेल नाही असा शांत बसुन  या सगळ्यांची चौकशी करत होता. शेवटी शेवटी तर मला अस वाटायला लागल की जे काही गेल्या तिन-चार दिवसात घडल ते जणु काही माझ्याच बाबतीत बहुदा घडलं असावं.
या कोंडीतुन बाहेर पडण्यासाठी मग मीच विचारलं," अरे , काय घेणार?"
"काय घेणार म्हणजे. ओल्ड मंक दुसरं काय बच्चु."
बच्चु म्हटल की मी वैतागतो हे साला कधी विसरतच नाही.
यावर मी काही बोलणार तेव्हड्यात हे महाराजच म्हणाले," शंकर, फुल खंबा घेवुन ये."
यावर मी चाचरतच बोललो," यार जास्त होईल."
"बच्चु ही माझी एकट्याची ऑर्डर आहे. तुझं बोलं."
"तु खंबा एकटा पिणार?"
"मग.... मी काही तुझ्या सारखा बायकोला घाबरत नाही."
हा बोलतो यात अजीबातच तथ्य नाही असं नाही. पण मी बायकोला घाबरतॊ हे मात्र झुट. आयला बायकोला मी रिस्पेक्ट देतो यात काही चुक आहे का? पण या गोष्टीची सर्व मित्र टर उडवतात याची मला खुप चिड येते.
माझ्या चेहर्‍यावरचा राग त्याने ओळखला आणि हसुन म्हणाला," शंकर , साब के लिये भी खंबा लेके आना."
खर सांगायच तर मलाही खंबा पिण्याचा मोह होत होता पण मग.....  बायकोचा चेहरा डोळ्या समोर आला.  त्यामुळे लगेचच बायकोला रिस्पेक्ट देण्याची तिव्र भावना मनात उत्पन्न झाली .खरच सांगतो विश्वास ठेवा मी काही तिला घाबरलो नव्हतो.
या मनकवड्याने मात्र माझ्या चेहर्‍यावरचे भाव लगेचच टिपले आणि नेहमी प्रमाणे खदखदुन हसला. त्याच्या या हसण्याची मला इतर वेळी चीड आली असती पण आजच त्याच हे हसण मला सुखावुन गेलं.
मग त्यानेच विचारल,"व्होडका सांगतो. वास कमी येईल."
"नको,मी पण  ओल्ड मंक घेणार .पण फक्त क्वार्टर. ना जादा ना कम."
"बच्चु आत्ताच सांगतो नंतर नेहमी सारखी माझ्यातली मागायची नाही. पाहीजे तर अजुन खंबा मागव. चिंता मत कर आपुन बील देनेवाला है."
हे ऎकल्यावर मला परत एकदा खंबा पिण्याची सुरसुरी आली. पण मागच्या होळीच्या दिवशी माझा झालेला वकार युनुस आणि त्या नंतर कुटुंबाने होळीलाच केलेला शिमगा आठवला....... आणि बायको विषयीचा माझ्या मनातला रिस्पेक्ट.... तो ही आठवला.
मी अवंढा गिळुन म्हणालो," उद्या ऑफिस आहे नाहीतर....... "
यावर तो काहीच बोलला नाही.
थोड्याच वेळात शंकर सगळ घेवुन आला. त्याला आमचे ग्लास कसे भरायचे ते माहित होतच. पहिला घोट घेतला आणि मनाला कसं बर वाटलं. खर सांगायच याने आमच्या बरोबर बसायच बर्‍याच वर्षां पासुन कमी केल होतं. अर्थात तो आमच्या पार्ट्या कधी चुकवायचा नाही जे जितक सत्य तितकच सत्य हे ही होत की तो रात्री दहा नंतर कितीही आग्रह केला तरी अजिबात थांबायचा नाही. कारण काय तर म्हणे सत्त्या घरी वाट पाहात असेल. माय फुट. साला वहिनींना घाबरुन घरी जात असेल.
काहीही असो आज मात्र मला हवी असणारी त्याची कंपनी पुरेपुर मिळणार होती. दोघांचाही पहीला ग्लास अर्धा संपेपर्यंत आम्ही दोघही चुपचापच होतो. सहाजिकच आहे सत्त्याच्या या आत्महत्येच्या भानगडी मुळे हा काहीसा हादरला नक्कीच होता. त्या मुळे हा कधी बोलायला सुरुवात करतो याची मी वाट पाहात होतो. लेटस टेक हिज ओन टाईम यार. च्यायला मी प्यायला बसलो की माझ मराठी प्रेम कुठे जात कोण जाणे. इन दॅट टाईम  आय थींक इन इंग्लिश अ‍ॅन्ड अल्सो स्पीक इन इंग्लिश व्हेरी वेल. .........
"बच्चु काहीतरी चकणा सांग यार."
चला बाबाची एकदाची बोलती सुरु झाली. व्हेरी नाईस.
"चिकन सांगु का? टीक्का की तंदुरी."
"काहीही सांग. तुला आवडतं ते."
मी ऑर्डर दिली आणि शंकर ती आणायला गेला. मग परत हा बाबा शांत. शेवटी दोघांचाही पहिला ग्लास संपला. आमच्या ग्रुपचा एक नियम आहे फर्स्ट पेग इक्वल अ‍ॅन्ड कॉप्लीमेंटली... चुकलो यार कंपल्सरी म्हणायचं होतं. एनी वे आय स्पीक इंग्लिश व्हेरी वेल.
त्याने त्याचा दुसरा पेग भरला अन मी पण. पाहातो तर काय साल्याने रॉच सीप मारला. मी काही बोलणार यावर तोच म्हणाला," बच्चु रॉ मारणार का?"
आय वील ड्रींक बट विइथ डिसेन्सी . दीज पिपल् यु नो.........
"नको, मी आपल नेहमी सारख हाफ थम्स अप अ‍ॅण्ड आधा सोडा."
त्यानंतर त्याचा दुसरा पेग त्याने दोन सीप मध्येच संपवला . हे पाहुन मी जरा हादरलोच.
मी काही बोलणार एव्हड्यात तो म्हणाला," आज परत आपले जुने दिवस आठवले यार."
"मलाही"
"आठवतय तुला..."
"काय रे."
"माझ्या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी मी तुमच्या बरोबर बारमध्ये बसलो होतो."
"होना. तुझ डेअरींग बघुन तुला आम्ही मानलं होतं"
"माझ कसलं डेअरींग. हीच म्हणाली लग्न झालय म्हणजे सगळ्यांना सोडुन माझाच विचार करायची गरज नाही. मित्र बोलावतात तर जा."
"फेकु नकोस. वहिनी अस कस बोलतील."
"खरचं बोलली. तिचा स्वत:वरचा सगळ निभवुन नेण्याचा आत्मविश्वास पहिल्या पासुनच होता आणि आजही आहे."
"खरच रे. आम्ही सगळे गेल्या ४-५ दिवसातल त्यांच वागण पाहात आहोत."
"तुझा विश्वास बसणार नाही पण आज पण तिनेच मला तुझ्या बरोबर जरा बाहेर जावुन ये असं सुचवलं."
"ग्रेट यार. मानना पडेगा."
यावर स्व:ताचा तिसरा पेग भरता भरता एक सुस्कारा टाकत त्यानं विचारलं,"तुला आठवत का रे मी नक्की कधिपासुन तुम्हा सर्वांन बरोबर बसायच कमी केल ते."
"साधारण आठवतयं. सत्त्या लहान असतानाची गोष्ट असेल... हो ना."
"बच्चु. तुला ते कळल होत तर आणि आजही ते आठवतय पण....."
यावर मी काही बोलणार तेव्हाढ्यात यान तिसरा पेग एका झटक्यात रॉच गिटकवला की.
आता मात्र मी सटपटलोच. कारण गेले कित्येक वर्ष याने पिण कमी केल होत. आणि आज... पुर्ण खंबा आणि तो ही रॉच मारण्याचा याचा विचार स्पष्ट दिसत होता. आता मात्र याला काहीही करुन थांबवायला हवं होतं हे नक्कीच.
"बच्चु चिकन यायला वेळ असेल तर भुस्कट सांग." चौथा पेग भरत भरत तो म्हणाला.
भुस्कट म्हणजे आमच्या ग्रुपची खास डीश जी फक्त आमच्या साठीच बनायची. मिक्स फरसाण, त्यावर कोथींबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या अन लसणाची खमंग फोडणी.... हा चकणा, तो ही फ्री, शेट्टी आम्हाला द्यायचा ते ह्या बाबा मुळेच.
पण आम्ही सांगण्या पुर्वीच भुस्कट टेबलावर आलचं. मी काही बोलणार तेव्हड्यात शंकरच म्हणाला, " दादाले भुस्काट लागणार मले माहित नाही का जी."
या साल्यावर सगळेच इतक का प्रेम करतात कोण जाणे....
भुस्काट्च्या पहील्याच घासाला माझ्य टाळूला झणझणलचं. त्याला मात्र काही वाटलं नसावं.
" सांग बर तुला नक्की कधी जाणवलं मी तुमच्या पासुन काहीसा वेगळा झालो." त्यानं विचारलं.
मी काही बोलणार , तोच स्वत:शीच पुटपुटल्या सारखा म्हणाला," तुला कस कळणार नक्की कधी अन का."
हा बोलतोय बघुन मी आज श्रोत्याची भुमिका स्विकारायच ठरवलं........
"सत्या लहान होता त्यावेळी डॉक्टरांनी त्याच छोटस ऑपरेशन करायचा सल्ला दिला होता. जेमतेम ३ वर्षाचा होता सत्त्या."
"अरे हो आठवतय मला पण.."
"एव्हड्या लहान वयात त्याच ऑपरेशन करावं लागणार हे ऎकुन माझा धीरच खचला. पण ही खरीच धीराची. तिनच मला समजावलं की त्याच्याच भल्यासाठी डॉक्टर ऑपरेशन करणार आहेत ना?"
बोलता बोलता त्यान पु्ढ्यातला पेग देखिल एका झटक्यात रॉच मारला. आता मात्र मला काळजी वाटायला लागली कारण माझा दुसरा पेग संपण्या पुर्वीच महाराजांचे चार पेग गट्ट्म झाले होते.
" अरे बाबा सावकाश. एव्हडी घाई का रे."
पण त्याच मी काय बोलतोय या कडे कुठं लक्ष होतं.....
पुढचा पेग भरत तो म्हणला," शेवटी ऑपरेशनचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी पहिलच ऑपरेशन सत्त्याच करायच डॉक्टरांनी ठरवलं होतं. मी ,ही आणि सत्त्याचे आबा असे तिघ त्याला घेवुन हॉस्पीटल मध्ये गेलो. डॉक्टर तयारीतच होते. त्यांनी लगेचच त्याला ऑपरेशन थेटर मध्ये न्यायला सांगीतलं."
" साल्या मी रागावलो होतं मला त्या वेळी बरोबर नेलं नाहीस म्हणुन."
मी त्याच्याकडे बघितल त्याचे डोळे काहीसे लालसर झालेले दिसले. एव्हडा गटागटा प्यायल्यावर दुसरं काय होणार म्हणा....
"लहान असल्याने त्याला ऑपरेशन थेटरमध्ये येकटाच नेला तर तो घाबरेल म्हणुन डॉक्टरांनी त्याला विचारलं," तुला तपासायला आत नेताना बरोबर कोण हवं बाळा?". मला वाटलं तो हिच किंवा त्याच्या आबाच नाव घेईल. पण स्साला त्यानं बाबा बरोबर हवा असं सांगीतल. तुला माहितेय त्याच्या बाबतीत मी किती हळवा होतो. एकतर त्याच्या ऑपरेशन मुळ मी घाबरलो होतो त्यातच ते थेटर, त्यातली हत्यारं, मग भलेही ती त्याच्याच हितासाठी वापरली जाणार होती. पण ते दृष्य मी कस पाहाणारं होतो. त्याच्या शरीरावरचा छोटासा ओरखडा  देखिल मला सहन होतं नसे मग..."
मला त्याच्या हा मनस्थितीची कल्पना येवू शकत होती कारण त्याचं सत्त्याबाबतीतलं हळवेपण आम्हा सर्वांनीच अनुभवलं होतचं की.
" मालुम है यार. आय कॅन अंडरस्टंड."
" मग काय गेलो आत त्याला घेवुन. थेटर मधल्या ऑपरेशन टेबलावर त्याला डॉक्टरांनी झोपवायला सांगीतलं. सत्त्याला मी टेबलावर झोपवलं. नेहमीचेच डॉक्टर असल्याने तो त्यांना चांगलाच ओळखत होता. त्या मुळे आता बाहेर जायला हरकत नाही म्हणून मी डॉक्टरांना सांगुन बाहेर जायला निघालो....."

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: